सव्वा ते दीड लाख रुग्ण मे महिन्याच्या अखेरीस असतील असा अंदाज केंद्राच्या पथकाने नोंदवला होतो. दरम्यान ४७ हजार १९० ही करोना रुग्ण संख्या असली तरीही ३३ हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. उर्वरित १३ हजारांच्या आसपास रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूपच रुग्ण महाराष्ट्रात आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.  १५७७ मृत्यू हे करोनामुळे झाले आहेत ही बाब निश्चितच दुर्दैवी आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

करोनासोबत जगायचं म्हणजे काय?

पुढचे काही महिने मास्क लावावा लागणारच

आपले हात वारंवार धुत रहाणे

एक विशिष्ट अंतर राखूनच काम करणं

सॅनिटायझर सातत्याने वापरणं

स्वच्छता बाळगणं

या सगळ्या गोष्टी करणं म्हणजेच करोनासोबत जगणं असा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समजावून सांगितला. पुढचे काही महिने हे आपल्याला करावं लागणारच आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पिढ्यांमध्ये न पाहिलेली ही परिस्थिती आहे. मी मुस्लिम बांधवांना विनंती करतो की करोनाचं संकट नष्ट होवो अशी दुवा मागा. लॉकडाउन केला आणि आपण त्यातून काय साधलं याची कल्पना देतो. काहींना अजूनही याचं गांभीर्य कळत नाही. याचा अर्थ काय? ते तुम्हाला समजलं असेल. मास्क सक्तीचा का? हात का धुवायचा? या संदर्भातले बॅनर्स लावले आहेतच. करोनासोबत जगायचं म्हणजे काय ? ते मी सांगतो आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पुढचे काही दिवस आपल्याला ही काळजी घ्यावी लागणार आहे.

रक्तदान करण्याचं आवाहन

सध्या राज्यात ८ ते १० दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. याआधी जेव्हा रक्तदानाचं आवाहन केलं होतं तेव्हा तुम्हाला थांबा असं सांगावं लागलं होतं. आता स्वतःची पूर्ण काळजी घेऊन रक्तदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. रक्ताचा साठा ८ ते १० दिवस पुरेल इतका आहे. मात्र येत्या काळात रक्तदान करा, ते करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.