महाराष्ट्रावर आजवर अनेक संकटं आली पण महाराष्ट्र कधी घाबरला नाही आणि कधी घाबरणारही नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. विरोधकांकडून विविध प्रकारे महाराष्ट्रातील सरकारला कोंडीत पकडण्याबाबत कामं केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीनं ‘महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही’ या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ तसंच ‘महाराष्ट्र कधी घाबरला नाही, कधी घाबरणार नाही’. राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा आपण मुकाबला करुच पण जर राजकीय संकट आमच्यावर कोणी आणू इच्छित असेल तर हे संकट सुद्धा हा महाराष्ट्र मोडून-तोडून फेकल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास आता मला नक्कीच आला आहे”

संत गाडगेबाबांच्या वचनानुसार सरकारचं काम सुरु आहे. त्यामुळेच सरकारच्या वर्षपूर्तीचा आढावा घेणारी जी पुस्तिका काढण्यात आली आहे, त्याच्या मागच्या कव्हरवर गाडगेबाबांचं हे वचनं छापण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जुन सांगितलं.

“शिवसेनाप्रमुखांनी मला जनतेशी नेहमी नम्र राहण्याचा सल्ला दिला आहे. डोक्यात हवा गेल्यास त्याला टाचणी लागायला वेळ लागत नाही. हे सर्व संस्कार आणि आपलं सर्वांचं सहकार्य यामुळे माझे पाय जमिनीवर आहेत. ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच वाटचाल करु शकतो. जो तरंगायला लागतो तो तरंगत तरंगत कुठेही जातो, असं सांगताना एकूणच सरकारचे पाय मजबूत आहेत आणि या मजबूत पायांनी आम्ही एकेक पाऊल पुढे टाकत राहू, त्यामुळे तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला तडा काय चराही जाऊ देणार नाही,” असा विश्वास देतो असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.