सावधगिरीसाठी आरोग्य विभागाकडून सर्वेक्षणाच्या सूचना

पुणे : ‘निपा’ विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराचा महाराष्ट्राला धोका नाही. आतापर्यंत राज्यात निपाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. सर्व शासकीय  खासगी रुग्णालयांना निपाची लक्षणे दिसणारे रुग्ण आढळल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, सावधगिरीचा उपाय म्हणून राज्यभरात सर्वेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने  दिल्या आहेत.

केरळमधील कोझिकोडे जिल्ह्य़ात ‘निपा’ विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराचा उद्रेक झाल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत. अनेकांवर उपचार सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर, ‘निपा’ विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराचा राज्यभरात आढावा घेण्यात आला. आतापर्यंत राज्यात निपाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. आरोग्य विभागाने निपा विषाणूंमुळे होणाऱ्या आजारामध्ये काळजी घेण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सर्व रुग्णालयांना पाठवल्या आहेत. ‘निपा’ विषाणू आजारात विशेषत: ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. या आजारावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यातील रुग्णालयांना विलगीकरण कक्ष सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी या संदर्भात माहिती दिली. ‘महाराष्ट्रात ‘निपा’चा धोका नाही. मात्र, सावधगिरीचा उपाय म्हणून सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांना ‘निपा’ची लक्षणे दिसणारा रुग्ण आढळल्यास त्याबाबतची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. या आजाराचा महाराष्ट्रात धोका नसला, तरी खबरदारी म्हणून नागरिकांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे,’ असे त्यांनी सांगितले.