देशात करोनाचा शिरकाव सर्वात आधी केरळमध्ये झाला. केरळमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मात्र याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. सुरूवातीच्या काही दिवसांनंतर राज्यात करोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढत गेली. सध्या देशातील एकूण रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच देशात आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी एक महाराष्ट्रातील आहे. काळजी वाढवणारी गोष्ट देशात आतापर्यंत ६६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून, यातील २५ हजाराच्या जवळपास रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.

देशातील करोना रुग्णसंख्येत बुधवारी मोठी वाढ झाली. गेल्या २४ तासांत देशात ७८,३५७ जण करोना बाधित आढळून आले. तर याच कालावधीत देशात १ हजार ५४ जणांचा संसर्गानं मृत्यू झाला. नव्या रुग्णांमुळे देशातील करोना बाधितांची एकूण संख्या ३७ लाख ६९ हजार ५२४ इतकी झाली आहे. म्हणजे ३८ लाखांच्या उंबरठ्यावर हा आकडा पोहोचला आहे. यात ८ लाख १ हजार २८२ रुग्ण सध्या देशभरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर २९ लाख १ हजार ९०९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत करोनामुळे ६६ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील एकूण रुग्णांच्या आकडेवारी महाराष्ट्रातील एक चतुर्थांश रुग्ण आहेत. महाराष्ट्रात नवीन १५ हजार ७६५ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३२० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या ८ लाख ८ हजार ३०६ इतकी झाली आहे. तर मृतांचा २४ हजार ९०३ वर पोहोचला आहे.

एकीकडे राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत असताना ही आकडेवारी वाढत आहे. सरकारनं राज्यातंर्गत प्रवासावरील बंदी हटवली असली, तरी नागरिकांकडून योग्य ती खबरदारी न घेतली गेल्यास विषाणूंचा प्रसार होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.