सध्या राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. परंतु आपण वेळेत निर्णय घेतल्यानं करोनाचा गुणाकार थांबला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज (बुधवार) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. तसंच यावेळी त्यांनी राज्याचा मृत्यूदर सहा टक्क्यांवर आल्याची माहिती दिली.

सध्या राज्यातील मृत्यूदर वाढला आहे. राज्यातील मृत्यू दर सहा टक्क्यांपर्यंत गेला आहे. तो सरासरी मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली असल्याची माहिती टोपे यांनी दिली. करोनानं ग्रासलेले वयोवृद्ध व्यक्ती तसंच मधुमेह, किडनी, हृदयाचे त्रास असलेले व्यक्ती ज्यांना करोना झाला त्यांचं मृत्यूचं प्रमाण ९५ टक्के आहे. आपल्याला मृत्यूदर कमी करायचा आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

आज आयएमएची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्या बैठकीला राज्याचे प्रमुख पदाधिकारी आले होते. त्यावेळी त्यांनी खासगी रूग्णालयात प्रॅक्टीस सुरू करणार असल्याचं सांगितलं. तसंच प्रत्येक ठिकाणी रक्षक हॉस्पीटल सुरू करणार असल्याची माहिती दिली. त्यात चाचणी, ओपीडी सर्वकाही होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मास्क बंधनकारक

महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या ११३५ वर पोहचली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. आजपर्यंत १२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जर बाहेर पडावं लागत असेल किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर पडायचं असेल तर मास्क वापरणं सक्तीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सोशल डिस्टन्सिंग सगळ्यांनी काटेकोरपणे पाळावं असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. अगदी कॉटनचा मास्क वापरलात तरीही चालेल मात्र वापरणं सक्तीचं आहे असंही ते म्हणाले.