भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला काही दिवसांपूर्वी अचानक आग लागली. मध्यरात्री सारेच झोपेत असताना दहा नवजात बालकांवर काळाने घाला घातला. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. तीन बालकांचा आगीमुळे तर सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील आगीचा रिपोर्ट आज (बुधवारी) येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गरज पडल्यास कॅबिनेटच्याही निदर्शनास हा रिपोर्ट नक्की आणून देऊ. भंडारा उपजिल्हा रुग्णालय जळीतप्रकरणाचा रिपोर्ट अजून आमच्या विभागाचे सचिव आणि आयुक्त यांच्यापर्यंत आलेला नाही. मात्र तो आज येईल. या रिपोर्टचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभाग स्तरावर केली जाईल. रिपोर्टमध्ये असलेल्या गोष्टींच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्यांना शिक्षा होईल यात शंका नाही. मात्र ही सगळी व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू”, असे आश्वासन टोपे यांनी दिले.
या घटनेनंतर राजेश टोपे यांनी संवेदना व्यक्त केल्या होत्या. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. शनिवारी मध्यरात्री ही दु्र्दैवी घटना भंडाऱ्यातील जिल्हा रूग्णालयात घडली. मृत बालकांच्या कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती. तसेच, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2021 2:19 pm