महाराष्ट्रात लॉकडाउन लावण्यासंबंधी औपचारिक निर्णय पुढील दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. १४ एप्रिलला मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून या बैठकीत लॉकडाउनसंबंधी निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्ससोबत दोन तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे बोलत होते.

राज्यात दोन-तीन दिवसांत टाळेबंदी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा केली. करोनाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांची टाळेबंदी करावी, असे मत तज्ज्ञांनी मांडले. प्राणवायू उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, खाटांची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही आदी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. कृती गटाचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव विजय सौरव आदी सहभागी झाले होते.

लॉकडाउन कधी लागणार?
लॉकडाउनसंबंधी विचारण्यात आलं असता राजेश टोपे यांनी सांगितलं की, “पुढील दोन दिवस अर्थ तसंच इतर विभागांशी मुख्यमंत्री चर्चा करतील. बुधवारी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्याची शक्यता आहे. एकदा हे सर्व झालं ती १४ मेपर्यंत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील”.

“करोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या लॉकडाउन हा एकमेव पर्याय असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. याबरोबरच सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. राज्यात लॉकडाउन लागू करण्याचे संकेत शनिवारी देण्यात आले होते. परंतु, लगेचच सोमवारपासून लॉकडाउन लागू केला जाणार नाही. सामान्य जनतेला दोन-तीन दिवसांचा अवधी द्यावा, अशी सूचना सर्वच राजकीय नेते व व्यापारी संघटनांनी केली होती. त्यानुसार पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतरच लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल. बहुधा १५ तारखेनंतर राज्यात लॉकडाउन लागू केला जाऊ शकते. त्यासाठी पुढील दोन-तीन दिवसांत राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल. सर्वांशी चर्चा करूनच दोन-तीन दिवसांत लॉकडाउनचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

टास्क फोर्समध्ये मतांतर – 
राजेश टोपे यांनी यावेळी टास्क फोर्समधील काही सदस्यांचं वेगळं मत असल्याची माहिती दिली. पण लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय नाही यावर बहुमत होत असं त्यांनी सांगितलं. ऑक्सिजन बेड आणि आयसीयूसंबंधी काही राज्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे असं ते म्हणाले आहेत.

रेमडेसिवीरचा प्रभावी वापर
राजेश टोपे यांनी यावेळी राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधांसंबंधी चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, “रेमडेसिवीरचा साठा आणि प्रभावी उपयोग पुढील १५ दिवसांसाठी महत्वाची बाब आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा असल्याने फक्त ज्यांना तात्काळ गरज आहे त्यांनाच ती उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न असून पुढील १० ते १५ दिवस महत्वाचे असणार आहेत”. दरम्यान खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत रेमडेसिवीरचा पुरवठा होईल असा निर्णय झाला आहे.

राजेश टोपे यांनी रेमडेसिवीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडेसिविरसंदर्भात डॉक्टरकडून अर्ज भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर कार्यवाही झाल्याची माहिती दिली.

सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर राज्यात लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती पुन्हा पंतप्रधानांना करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितलं आहे. लसीकरणात पुढे असलो तरी आणखी गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊ. हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल. आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला काही काळासाठी का होईना, कडक निर्बंध लावावेच लागतील, असे सूतोवाच ठाकरे यांनी केले.

कोणाला दिलासा मिळणार
राज्य सरकार लॉकडानमध्ये काही गोष्टींना परवानगी देण्याचा विचार करत आहे. मदत व पुनर्वसन विभाग सचिव असीम गुप्ता यांनी घरकाम करणारे, स्थलांतरित मजूर तसंच होम डिलिव्हरी करणाऱ्यांना घाबरण्याचं कारण नाही असं म्हटलं आहे.