राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना करोनाची लागण झाली आहे. उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी आपली प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

उदय सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेल्या १० दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार”.

याआधी २४ सप्टेंबरला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं. एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये सांगितलं होतं की, “काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती”.

आतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना
टाळेबंदी शिथिलीकरणात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती शंभर टक्के करण्यावरून सरकार आणि अधिकारी यांच्यातील वाद रंगला असतानाच मंत्रालय हे करोनाचा नवं केंद्रबिंदू ठरू लागलं आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झालेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड करोना बाधित झाले असून अप्पर मुख्य सचिव दर्जाच्या काही अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारमधील ४३ पैकी १५ मंत्री तसेच डझनभर अधिकारी करोना बाधित झाल्याने मंत्रालयात भीतीचे वातावरण पसरलं आहे.