सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच राज्यातही करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. हिंगोलीत आतापर्यंत ४७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. त्यापैकी ४१ हे एसआरपीएफचे जवान असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यापैकी एका रुग्णावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, आज (शुक्रवार) सकाळी एसआरपीएफच्या २५ जवानांनचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्यापैकी २० जवानांना एसआरपीएफच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर ५ जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं आहे. या जवानांचे यापूर्वीचे अहवाल निगेटिव्ह आले होते. आतापर्यंत एसआरपीएफच्या ४१ जवानांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी ३३ जवान हे मालेगावात तर ८ जण मुंबईत कर्तव्यावर होते, असंही रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात करोनाचे ४७ रुग्ण सापडले असून त्यापैकी एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तसंच यापैकी एका रुग्णाला नांदेड येथील शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात तर दुसऱ्या रुग्णाला औरंगाबादमधील धूत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अन्य रुग्णांवर हिंगोलीतच उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून देण्यात आली.