उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्या प्रकरणी वेगवान घडामोडी घडत आहेत. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले होते. जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. बैठकीनंतर अनिल देशमुखांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गृहमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चेसंबंधीही विचारण्यात आलं.

“शरद पवारांनी मुंबईत सध्या ज्या ताज्या घडामोडी सुरु आहेत त्याची माहिती घेतली. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटकं सापडली त्यातही काय घडामोड सुरु आहे याची माहिती त्यांनी घेतली. एनआयए आणि एटीएस या घटनेचा तपास करत असून राज्य सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. योग्य दिशेने तपास सुरु असून जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर राज्य शासनाच्या मार्फत कारवाई केली जाईल. पण जोपर्यंत एनआयएचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, चौकशी पूर्ण येत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यातून ज्या काही गोष्टी समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल,” असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपद जाण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर देणं टाळलं.

“मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणातील तपासात काही गंभीर चुका पोलिसांकडून झाल्याने आणि या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून बदली केल्याचं,” गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना याआधी सांगितलं. तर दुसरीकडे शिवसेना मात्र मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असं नाही सांगत त्यांची पाठराखण करत आहे.

वाझे प्रकरण सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप
“शिवसेना परमबीर सिंह यांचा जयजयकार करत आहे. गृहमंत्री जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी आयुक्तांची चूक नसल्याचं सांगितलं आहे. ही विरोधाभास वक्तव्यं सरकारची प्रतिमा अजून मलीन करत आहेत. वाझे प्रकरणातील तपासावरुन आतापर्यंत हे सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड असल्याचं लक्षात येत आहे. याचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत का?,” असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.