देशातील चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्याबरोबरच केंद्र सरकारनं काही गोष्टी सुरु करण्यासाठी शिथिलता दिली. सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्याच्या दिशेनं केंद्र सरकार पाऊल टाकत असून, देशातंर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे. २५ मे पासून देशातंर्गत विमान सेवा सुरू होत असून, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेड झोनमधील विमानतळं सुरू करण्यास विरोध केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वाची विमानतळे रेड झोनमध्येच येत असल्यानं सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
चौथ्या लॉकडाउनची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातून अनेक सेवा आणि व्यवहारांना शिथिलता देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर एनडीआरएफनं याविषयीची नियमावली जारी केली होती. यात विमानसेवा बंद राहिल, असं म्हटलं होतं. मात्र, सरकारनं निर्णयात फेरबदल करत मर्यादित स्वरूपात देशातंर्गत विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी २५ मेपासून मर्यादित स्वरूपात देशातंर्गत विमानसेवा सुरू करत असल्याची माहिती दिली. विमान वाहतूक कंपन्या आणि विमानतळ प्रशासनांना याविषयी सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. केंद्राच्या निर्णयाप्रमाणे उद्यापासून (२५ मे) देशातंर्गत विमानसेवा सुरू होत आहे. मात्र, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेड झोनमधील विमानतळ सुरू करण्यास विरोध केला आहे.
“रेड झोनमधील विमानतळ अशा परिस्थितीमध्ये सुरू करणं अत्यंत धोकादायक आहे. स्वॅबशिवाय प्रवाशांचे नुसते थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालवणे शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढवणे हे चुकीचे आहे. ग्रीन झोनमधील प्रवाशांना रेड झोनमध्ये आणून संसर्ग/प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना करोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीनं चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे आपोआपच धोकाही वाढेलच,” अशी भूमिका अनिल देशमुख यांनी मांडली आहे.
रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे.स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काय फायदा? सद्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 23, 2020
करोना प्रसाराची भीती…
राज्यातील महत्त्वाची विमानतळं असलेली शहरांमधील स्थिती सध्या चिंताजनक आहे. मुंबईतील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा राज्यातील एकून रुग्णांच्या संख्येपैकी निम्मा आहे. त्याचबरोबर मुंबईपाठोपाठ पुणे, नागपूर औरंगाबाद या शहरातही करोनामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे विमान वाहतूक सेवेमुळे करोना प्रसाराचा धोका होऊ शकतो.
