करोनानं देशाची आर्थिक राजधानी मुंबईला वेठीस धरली आहे. मागील दीड महिन्यांपासून या महानगराची जीवनवाहिनी असलेली लोकल ठप्प आहे. मुंबईतील स्थितीविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही वारंवार चिंता व्यक्त केली असून, मुंबईसमोर करोनाबरोबर आर्थिक आव्हानही उभं राहिलं आहे. याच विषयाकडे लक्ष देण्यासाठी राज्याचे गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला साद घातली आहे.

करोनानं मुंबईत अक्षरशः थैमान घातल्यासारखी परिस्थिती आहे. राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा २५ हजारांवर गेलेला असताना त्यातील १५ हजार रुग्ण फक्त मुंबईतील आहे. चिंतेची बाब म्हणजे चाचण्यांमध्ये देशात पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण सरासरी ३ टक्के असताना मुंबईत हेच प्रमाण १५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशातील हॉटस्पॉट असलेल्या महानगरांपैकी मुंबई वरती आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखी परिस्थिती असल्याचं चित्र आहे. याकडे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधून घेतलं आहे.

“भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे. देशात कररुपानं सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होत होता, पण आता मुंबईला नव्यानं उभारी देण्याची गरज आहे. मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची आवश्यकता आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ,” असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

राज्यात बुधवारी करोनाने ५४ जणांचा बळी घेतला. त्यात मुंबईतील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २, औरंगाबादमध्ये २, वसई- विरारमध्ये १ तर १ मृत्यू रत्नागिरीमध्ये झाला. राज्यातील एकूण मृतांची संख्या ९७५ झाली. राज्यभरात बुधवारी ४२२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात ५,५४७ रुग्ण करोनामुक्त झाले.