महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधवारी) जाहीर झाला. पुण्यातील वेल्हा तालुक्यातील घिसरगावमधील आकाश पंढरीनाथ धिंडले हा विद्यार्थी ७९ % मिळवून रात्र महाविद्यालयातून पहिला आला आहे. आकाश पुण्यातील एका केमिस्टमध्ये नोकरी करतो. त्याला सीएस व्हायचं आहे.

आकाश लहानपणापासूनच हुशार होता. दहावीत आकाशला ८१ टक्के गुण मिळाले. घरची परिस्थिती हालाखीची होती. पण, आकाशला खूप शिकायचं होतं.त्यांच्या आई- वडिलांचीदेखील हिच इच्छा होती. आकाशचे वडिल शेतकरी आहेत. गावात त्यांची ४ एकर जमीन आहे. पण शेतीच्या उत्पन्नावर शिक्षणखर्च भागणं शक्य नव्हता, तसेच शिक्षण अर्धवट सोडणंही आकाशला मान्य नव्हतं म्हणूच त्यानं पुण्यात नोकरी करून शिकण्याचा निर्णय घेतला.

पुण्यात तुळशीबागेतील कॉस्मेटिकच्या दुकानात काम करण्यास त्यानं सुरुवात केली. नोकरी करता करता पूना नाईट हायस्कूलमध्ये त्यानं वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. गेल्या दोन वर्षांपासून नोकरी सांभाळून आकाश शिकत आहे. आकाशला सीएस व्हायचं आहे आणि यासाठी वाट्टेल तितकी मेहनत घेण्याची तयारी त्यानं दर्शवली आहे.