महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE)बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. करोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बारावीच्या निकाल प्रक्रियेला बसला आहे. पाऊस आणि पुरामुळे काही शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांकडून निकाल प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितल्याने अंतिम टप्प्यात असलेली निकालाची प्रक्रिया काहीशी लांबली होती. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नव्हती.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या निकालाचीही उत्सुकता होती. जुलैअखेर इयत्ता १२ वी निकाल लागेल असा म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आल्याने अनेक कामे थांबली आहेत. यामुळे मंगळावरी ३ ऑगस्ट रोजी हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

 

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला काय?

महाराष्ट्र सरकारने केरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने जाहीर केला होता. महाराष्ट्र सरकारने बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दहावी साठी ३० टक्के, अकरावी साठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

निकाल कसा लागणार

बारावीच्या निकालात इयत्ता दहावीच्या गुणांना ३० टक्के भारांश असेल. दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील. तर इयत्ता अकरावीचा ३० टक्के भारांश असणार आहे. इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण बारावीच्या निकालात देण्यात येणार आहेत. तर इयत्ता बारावीसाठी ४० टक्के भारांश असेल. बारावीच्या वर्गासाठी ४० टक्के भारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आणि मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.