News Flash

मद्यपींवर लगाम, महिन्याला १२ नव्हे तर फक्त २ बाटल्या दारु बाळगता येणार

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दारुबंदीसाठी सुचना केली होती.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दारुबंदीसाठी केलेल्या सुचनांची अखेर राज्य सरकारने दखल घेतली आहे. आता ग्रामीण भागात दारु पिण्याचा परवाना असलेल्या मंडळींना महिन्याला देशी दारुच्या १२ बाटल्यांऐवजी फक्त २ बाटल्याच बाळगता येणार आहे. राज्य सरकारने या संदर्भातील निर्णय घेतला आहे.

उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात ग्रामीण देशी दारुच्या बाटल्या बाळगण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. यापूर्वी दारु पिण्याचा परवाना असलेल्या मंडळींना देशी दारुच्या १२ बाटल्या बाळगण्याची परवानगी देण्यात आली होती. अवैध दारुला आळा घालण्यासाठी आणि दारुबंदीला प्रोत्साहन देण्यासाठी अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला अनेक उपाय सुचविले होते. दारुच्या बाटल्या बाळगण्याची मर्यादा १२ वरुन दोनपर्यंत कमी करण्याची हजारे यांची सूचना होती. गेल्या आठवड्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशी दारु बाळगण्याची मर्यादा कमी करु असे सांगितले होते. वैयक्तिक सेवनासाठी दोन बाटल्या पुरेशा आहेत, असे सरकारचेही मत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले होते. मंगळवारी बावनकुळे यांनी परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला.

गेल्या आठवड्यात दारुबंदीसाठी सरकारने नवीन धोरण जाहीर केले होते. ग्रामसभेने साध्या बहुमताने ठराव केल्यास दारुच्या दुकानांना गावाच्या वेशीबाहेर १०० मीटरचा रस्ता दाखविण्याचे राज्य सरकारने ठरविले होते.  गावांमध्येही दारुच्या सेवनामुळे लोकांना त्रास होतो, धांगडधिंगा होतो. पूर्वी दारुची दुकाने गावाबाहेर होती व लोकवस्ती वाढल्यावर ती गावाजवळ आली, किंवा दारु दुकानाजवळ शाळा, प्रार्थनास्थळ बांधले गेले, अशीही उदाहरणे अनेक आहेत. दारु दुकानांमुळे लोकवस्तीत किंवा गावाला होणारा त्रास कमी करण्यासाठी ग्रामसभेने ठराव केल्यास ही दुकाने गावाबाहेर १०० मीटरवर नेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मद्यप्राशनासाठी वैयक्तीक मद्य परवाना बंधनकारक असून हा एक वर्षभराच्या परवान्यासाठी १०० रुपये तर आजीवन परवान्यासाठी एक हजार रुपये  आकारले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:50 pm

Web Title: maharashtra inforce two bottles home policy
Next Stories
1 जळगाव-एरंडोल मार्गावर दुचाकी-ट्रकच्या अपघातात तिघे ठार
2 भाजपच्या दणदणीत यशामागे मोदींचा कठोर आदेश
3 दापोली नगरपंचायत ‘त्रिशंकू’
Just Now!
X