कृष्णा- पंचगंगा नदीच्या महापुराबाबत महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये समन्वयामुळे नुकसान टळले, असा दावा दोन्ही राज्यातील मंत्र्यानी शनिवारी केला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी शिरोळ तालुक्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटक मधील उपस्थित अधिकाऱ्यांसोबत बोरगांव येथे आढावा बैठक घेतली.

यावेळी मंत्री जारकीहोळी व राज्यमंत्री यड्रावकर यांनी महापुरामुळे दोन्ही राज्यांमधील गावांना व जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागू नये. त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. चार दिवस धरणक्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली भागात महापुराची परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. दोन्ही राज्याकडून राखला जाणारा समन्वय यापुढे कायम ठेवला जाणार असल्याचेही यावेळी मंत्र्यांनी सांगितले.

विसर्गाचे योग्य नियोजन

सध्या महाराष्ट्रामधील प्रमुख धरणांमधून दीड लाख क्यूसेक्स, तर कर्नाटक मधील आलमट्टी धरणांमधून २ लाख २० हजार क्युसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. विसर्गाचे योग्य नियोजन केल्याने महापूर उद्भवू शकला नाही, अशी माहिती दोन्ही राज्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीमध्ये दिली.

करोना नंतर भाजपची सत्ता

दरम्यान, कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी आज शिरोळ येथे महापुराची पाहणी केली. त्यानंतर स्थानिक भाजपा नेते अनिल यादव यांच्या निवासस्थानी भेट दिली. करोना संकट काळानंतर महाराष्ट्रात भाजपा सरकार येणार असे विधान जोल्ले यांनी यावेळी केले. कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, कोल्हापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव यावेळी उपस्थित होते.