कर्नाटकव्याप्त भागात राहणाऱ्या मराठी भाषिक गावांना महाराष्ट्रात आणण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केल्यानंतर या चर्चेनं जोर धरला आहे. त्यातच कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई कर्नाटकाला जोडण्याची मागणी केली होती. कर्नाटकाकडून झालेल्या या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, “केवळ राज्य प्रमुख या नात्याने कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबत वक्तव्य केलं असून, त्याला कोणताही आधार नाही. हा वाद अनेक वर्षाचा आहे. कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नाही. कर्नाटकातील जनतेला खूश करण्यासाठी तेथील उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क लावला आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर निवडून यायचे. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. नंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केली,” असं सांगत पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं.
आणखी वाचा- “मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा किंवा…”; भाजपा नेत्याची मागणी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले होते?
“महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद भागात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की, मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. त्यामुळे जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही, तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं,” असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांनी म्हटलं होतं.
आणखी वाचा- “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये”
ही लढाई कशासाठी आहे?; संजय राऊतांचा सवाल
“मुंबई, महाराष्ट्रात जे आमचे कानडी बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्या आहे. इथं कानडी शाळा आम्ही चालवतो. आम्ही कानडी शाळांना अनुदान देतो. इथं अनेक कानडी संस्था देखील चालवल्या जातात. पण बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा, असं कधी कुणाला म्हणत नाही.” असं संजय राऊत यांनी सीमावादावर बोलताना म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 28, 2021 12:21 pm