अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज निर्मिती प्रकल्पांच्या स्थापित क्षमतेनुसार राज्याचा देशात दुसरा क्रमांक असला, तरी सौरऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्र माघारल्याचे चित्र असून आतापर्यंत केवळ २३७ मेगाव्ॉट क्षमतेचे ग्रीड संलग्न सौर फोटो व्होल्टाईक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकले आहेत.
भारताची नूतनशील ऊर्जा निर्मितीची क्षमता सुमारे ८९ हजार मेगाव्ॉट आहे, तर महाराष्ट्राची क्षमता त्याच्या १० टक्के म्हणजे ८ हजार ८४० मेगाव्ॉट इतकी आहे. पवन, सौर, बायोमास, ऊसाच्या चिपाडापासून सहवीजनिर्मिती हे अपारंपरिक ऊर्जेचे स्त्रोत आहेत. राज्याची सौरऊर्जा निर्मितीची क्षमता ४ ते ७ युनिट प्रतिचौरस मीटर दरदिवशी अशी आहे. ही ऊर्जा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असताना वीजनिर्मिती किंवा अन्य वापरासाठी या स्त्रोतांचा वापर करण्याकडे अजूनही फारसे लक्ष गेलेले नाही.
‘महानिर्मिती’च्या अहवालानुसार २०२२ पर्यंत ग्रीड संलग्न २० हजार मेगाव्ॉट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट गाठणे, हे ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियाना’त (जेएनएनएसएम) घोषित करण्यात आले होते. या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या १० टक्के लक्ष्य गाठण्याचे राज्याने प्रस्तावित केले, पण आतापर्यंत केवळ २३७.२५ मेगाव्ॉट क्षमतेचे प्रकल्पच राज्यात कार्यान्वित होऊ शकले आहेत. त्यात धुळे जिल्ह्य़ातील शिवाजीनगर, साक्रीच्या १२५ मेगाव्ॉट क्षमतेच्या प्रकल्पाचा समावेश आहे. परभणी, उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील चार प्रस्तावित प्रकल्पांचे काम रेंगाळले आहे. ‘महाऊर्जा’ मार्फत केंद्र शासनाकडून पंढरपूर, शेगाव आणि कऱ्हाड येथे सौर प्रारण मापन केंद्र उभारण्यात आले आहेत. अजून चार केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे.
गेल्या काही वर्षांत अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत महाराष्ट्राने प्रगती केल्याचे दिसत असले, तरी ते सौरऊर्जा मात्र अजूनही दुर्लक्षितच आहे. सौर फोटोव्होल्टाईक आणि सौर औष्णिक तंत्रज्ञानाच्या आधारे वीजनिर्मिती करता येते. अनेक राज्यांनी यात आघाडी घेतली असताना महाराष्ट्रात मात्र याची गती संथ आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात वीज निर्मिती करून पारंपरिक इंधनात बचत करता येते. वैश्विक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे ऊत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांचा तो एक महत्वाचा भाग ठरू शकतो. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौरऊर्जा मिशनच्या माध्यमातून राज्यात २०२२ पर्यंत साधारणपणे ग्रीड संलग्नित २ हजार मेगाव्ॉट आणि पारेषण विरहित २०० मेगाव्ॉट वीज निर्मितीचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. या लक्ष्यपूर्तीच्या मार्गात उदासीनतेचे अडथळे आहेत. सौर औष्णिक ऊर्जा साधनांमध्ये सौर उष्णजल संयंत्र, सौर चूल, सौर कंदिल, सौर घरगुती दिवे, सौर पथदीप, सौर कुंपण अशा अनेक प्रकारांचा समावेश आहे. राज्यात अनेक भागात या साधनांचा वापर करण्यात आला आहे, पण देखभालीअभावी ही साधने शोभेच्या वस्तू ठरल्याचे चित्र आहे.