16 November 2018

News Flash

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड विजयी; विरोधकांची मते फुटली

राष्ट्रवादीच्या एका आमदारानेही प्रसाद लाड यांना मतदान केल्याचे समजते

विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड भरघोस मताधिक्याने विजयी झाले आहेत.

राज्यातील विधान परिषद पोटनिवडणुकीत गुरूवारी भाजपच्या प्रसाद लाड यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला. या निवडणुकीत लाड यांना २०९ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या दिलीप माने यांना अवघी ७३ मते मिळाली. या निवडणुकीत दोन मते बाद ठरली. मात्र, लाड यांना मिळालेली अतिरिक्त मते पाहता विरोधकांची ९ मते फुटल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी हा मोठा हादरा असल्याचे मानले जात आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी गुरुवारी पोटनिवडणूक पार पडली. भाजपतर्फे प्रसाद लाड रिंगणात होते. तर काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी दिली होती. गुरुवारी झालेल्या मतदानात अपेक्षेप्रमाणे प्रसाद लाड यांनी बाजी मारली. त्यांना २०९ मते मिळाली. तर काँग्रेसच्या दिलीप माने यांना ७३ मते मिळाली.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे समर्थक दोन आमदारांची मते भाजपला मिळाली. नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी भाजपच्या पारड्यात मत टाकल्याचा अंदाज आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या एका आमदारानेही प्रसाद लाड यांना मतदान केल्याचे समजते.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना विधानसभेतील २०७ मते मिळाली होती. यावेळी त्यामध्ये आणखी दोन मतांची भर पडली. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा हादरा असल्याचे सांगितले जाते. छगन भुजबळ हे सध्या तुरुंगात असल्याने आधीपासून विरोधकांचे एक मत कमी झाले होते.

लाड यांना भाजप १२२, शिवसेना ६३, बहुजन विकास आघाडी (तीन), अपक्ष (७), राष्ट्रीय समाज पार्टी (एक) अशी १९६ मते मिळतील असा अंदाज होता. या पेक्षा जास्त मिळवून भाजपने विरोधकांना धूळ चारली आहे.

First Published on December 7, 2017 6:34 pm

Web Title: maharashtra legislative council election 2017 bjp prasad lad beat congress dilip mane