मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष दिलेल्या नाशिकच्या भाजपमध्ये पडलेली उभी फूट, मराठा-ओबीसी वादात एकवटलेले मराठेतर घटक, परवेझ कोकणींना डावलल्याने मुस्लीम समाजातून मिळालेली रसद आणि मजबूत आर्थिक बाजू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या दणदणीत विजयात हे घटक प्रभावी ठरले. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या सर्वाना पराभवाची एकहाती धूळ चारताना शिवसेनेला त्यांचा मूळ आधार असलेल्या ओबीसी कार्डची मदत झाली. तुरुंगातून जामिनावर सुटलेल्या छगन भुजबळांसह भाजपमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांची नावे खुद्द विजयी उमेदवार सांगत आहे. या निकालाने राष्ट्रवादीला जागा गमवावी लागली. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतील विजयाने आपल्याच मस्तीत राहिलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही चपराक बसली. अखेपर्यंत तळ्यात-मळ्यात करत संदिग्ध भूमिका ठेवण्याची किंमत त्यांना मोजावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी भाजप, मनसेचा पाठिंबा मिळालेल्या काँग्रेस आघाडीच्या अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांचा १६७ मतांच्या फरकाने पराभव केला. विजयी होण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसताना आणि सर्व विरोधक एकवटले असताना शिवसेना स्वबळावर हा चमत्कार घडविण्यात यशस्वी झाली. यानिमित्ताने विधान परिषदेच्या या मतदारसंघावरील राष्ट्रवादीचे वर्चस्व संपुष्टात आले. स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत खदखद असूनही सेनेने निवडणुकीचे प्रारंभापासून सूत्रबद्ध नियोजन केले. दगाफटका होऊ नये म्हणून खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सदस्यांना तंबी दिली. आर्थिक ताकत जोखत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि कधी काळी भुजबळांचे निकटवर्तीय असणाऱ्या राष्ट्रवादीच्या दराडे यांना सेनेने रिंगणात उतरवले. राष्ट्रवादीने ही जागा राखण्यासाठी सेनेतून हकालपट्टी झालेल्या सहाणे यांना उमेदवारी देताना आर्थिक सक्षमता हाच निकष जपला. जवळपास १७८ (पुरस्कृत धरून) संख्याबळ असणाऱ्या भाजपची संदिग्ध भूमिका सेनेच्या पथ्यावर पडली. भाजपचे नेतृत्व पक्षाशी संबंधित अपक्ष उमेदवार परवेझ कोकणींना पाठिंबा द्यावा, राष्ट्रवादीला मदत करावी की सेनेला पाठिंबा द्यावा या संभ्रमात राहिले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील समीकरण लक्षात घेत भाजपने पावले उचलली. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीच्या पारडय़ात मतदान करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. मात्र तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. दुसरीकडे पालकमंत्री गिरीश महाजन यांची सूचना भाजप नगरसेवकांनी धुडकावल्याचे निकालावरून लक्षात येते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra legislative council election 2018 nashik shivsena narendra darade won against ncp bjp alliance
First published on: 24-05-2018 at 11:00 IST