अमरावती मतदारसंघ

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे हे यावेळी इतर पक्षांची किती मते खेचतात, याचीच सर्वाना उत्सुकता आहे. शिवसेना, प्रहार, युवा स्वाभिमान आणि काही अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

या मतदारसंघात भाजपचे २००, काँग्रेसचे १२८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, शिवसेनेचे २८, प्रहार, युवा स्वाभिमान, इतर पक्ष आणि अपक्ष मिळून ४८९ मतदार आहेत. ४८८ जणांनी मतदान केले आहे. निवडणुकीत घोडेबाजार अटळ असल्याची चर्चा होती. आकडेवारीनुसार प्रवीण पोटे यांची बाजू भक्कम दिसत आहे. उमेदवार निश्चित करण्यापासून ते प्रचार यंत्रणा राबवताना काँग्रेसची कमकुवत बाजू सातत्याने समोर आली. परिणामी, भाजपचे बळ वाढले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे वगळता कुठलाही बडा नेता जिल्ह्यात फिरकला नाही. काँग्रेसचे उमेदवार अनिल माधोगडिया यांना एकाकीपणे प्रचार करावा लागला. मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यापासून तर मतदारांच्या ‘अपेक्षा’ पूर्ण करण्यात त्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसले. निरुत्साही वातावरणातही काँग्रेसचे नेते विजयाची पताका फडकवू, असा आशावाद व्यक्त करीत होते. याउलट, भाजपने सत्ताबळाचा फायदा घेत अनेक विरोधकांनाही आपल्या तंबूत ओढले. आमदार बच्चू कडू हे भाजपचे कट्टर विरोधक. त्यांनी पोटेंना बिनशर्त पाठिंबा दिला. पोटे यांचे आणखी एक विरोधक आमदार रवि राणा अखरेच्या क्षणी भाजपकडे झुकले. आपल्यासोबत ४७ हून अधिक सदस्य असल्याचा त्यांचा दावा होता.