नाशिक मतदारसंघ

एकाही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. स्वत:ची हक्काची मते सांभाळून दुसऱ्याच्या घरातून जितके खेचता येतील, तितकी मते खेचायची, असे प्रारंभीचे गणित अखेरच्या टप्प्यात पूर्णपणे बदलले. शिवसेना-भाजप यांच्यात पालघर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीमुळे उफाळलेला वाद राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक मतदारसंघात संदिग्ध भूमिका बाळगणाऱ्या भाजपने अखेरीस राष्ट्रवादीला साथ देत सेनेची कोंडी करण्याची खेळी केली. पण, हा निर्णय इतक्या विलंबाने झाला की, तोवर भाजपच्या सदस्यांना सेनेकडून गळाला लावण्याचे निकराचे प्रयत्न झाले. शिवसेना विरोधात काँग्रेस आघाडी, मनसे, भाजप अशी ही लढाई झाली. राष्ट्रवादीने जागा कायम राखल्यास भाजप विजयाचा शिल्पकार ठरेल. मात्र, विपरित घडल्यास भाजपसह विरोधकांना एकाचवेळी स्वबळावर धूळ चारल्याचा आनंद शिवसेनेला मिळणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे, काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष परवेझ कोकणी हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. कोटय़ाधीश उमेदवारांना संधी देऊन सेना, राष्ट्रवादीने मते खेचण्याची व्यवस्था केली.

पालघर पोटनिवडणुकीतील वचपा काढण्यासाठी भाजपने अपक्ष उमेदवाराला मदत करण्याचा विचार सोडून थेट राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत झाली.

सर्व पक्षांना मतांची फाटाफूट झाली असेल की काय, या भीतीने ग्रासले आहे. याची कल्पना मतदानाआधीच सर्व पक्षांच्या प्रमुखांना आली असेल. त्यामुळे खुद्द उद्धव ठाकरे यांनी मतदानाआधी शिवसेना मेळाव्यात सावध राहण्याचा इशारा दिला होता.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनाही स्वपक्षीय मतदारांना तंबी द्यावी लागली. राजकीय पक्षांनी आपली मते फुटणार नाही, याची दक्षता घेतली. भाजपमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले. निवडणुकीस मराठा-वंजारी असे स्वरुप प्राप्त झाले. जातीय आधारांवर मतविभाजनाचा प्रयत्न झाला.

एकेका मतांसाठी लाखोंची बोली लावली गेली. ऐनवेळी भाजपची मोठी रसद मिळाल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक ठरले. हे संख्याबळ मतदानात झिरपले असल्यास राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग सुकर होईल. भाजप नेत्यांचे आदेश सदस्यांनी पाळले का, आघाडी असूनही काँग्रेसने राष्ट्रवादीला साथ दिली की नाही, सेनेने विरोधी गोटातील किती मतांना सुरुंग लावला, अशा अनेक प्रश्नांची उकल मतमोजणीतून होणार आहे.