सतीश कामत, रत्नागिरी

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मिळून बनलेल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात सरळ लढत झाली.

राज्यातील प्रमुख पक्षांपैकी कागदोपत्री भाजप-सेनेची युती आहे, तर काँग्रेस, शेकाप, स्वाभिमान पक्षाने तटकरेंच्या चिरंजीवांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या पक्षांच्या बलाबलानुसार मतदान झाले असते तर निवडणूक चांगली रंगली असती. पण, विधान परिषदेच्या जागांसाठी होणाऱ्या अन्य निवडणुकांप्रमाणेच येथे केवळ ‘लक्ष्मीदर्शना’चा प्रभाव नाही, तर या निमित्ताने काही राजकीय हिशेब चुकते करण्याचीही संधी संबंधित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी साधली आहे. त्यामध्ये राणेंच्या ‘स्वाभिमान’ने तटकरेंच्या बाजूने दान टाकणे जितके स्वाभाविक आहे, तितकेच केंद्र आणि राज्यात सत्तेमध्ये भागीदार असलेल्या सेना-भाजपने परस्परांवर कुरघोडीचे राजकारण करणे अलीकडच्या काळात स्वाभाविक बनले आहे. ही निवडणूकही त्याला अपवाद राहिली नसल्याचे सांगण्यात येते आणि त्यासाठी पालघर लोकसभेची पोटनिवडणूक निमित्त ठरल्याचे सांगितले जाते. येथील भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना उमेदवारी देऊन सेनेने केलेल्या ‘दगाबाजी’बद्दल अद्दल घडवण्यासाठी भाजप नेत्यांनी या निवडणुकीची संधी साधली असल्याचेम्हटले जाते. त्याचबरोबर मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेवर आल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सेनेला कोंडीत पकडण्याचा कार्यक्रम वेळोवेळी ठिकठिकाणी केलेला आहे. तोच कित्ता याही निवडणुकीत कायम राहिला असल्याचे सांगण्यात येते. यानुसार खरोखरच घडले असेल तर या निवडणुकीची मतमोजणी ही केवळ औपचारिकता उरणार आहे आणि तसे न घडता भाजपने ‘राजधर्मा’चे पालन केले तरी तटकरेंचा दांडगा राजकीय अनुभव, संपर्क आणि सर्व प्रकारची ताकद चिरंजीवांच्या कामी येईल, अशी चिन्हे आहेत.