राज्यातील सरकार गोलगोल असून त्यात सगळा झोल झोल आहे. या ‘सोनू’ सरकारवर जनतेला भरवसा राहिलेला नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
सोमवारपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या अधिवेशनात शेतक-यांची कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, नेवाळी शेतकरी आंदोलन, कायदा व सुव्यवस्था, विविध खात्यातील भ्रष्ट्राचार, शिक्षण खात्यातील गोंधळ हे मुद्दे मांडणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून अद्याप एकाही शेतक-याला लाभ मिळालेला नाही. १० हजाराचा लाभही शेतक-यांना झाला नाही. दुसरीकडे तुरखरेदीचा प्रश्नही गंभीर असल्याचे मुंडेंनी सांगितले. एसआरए प्रकरणाचे धागेदोरे गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील अनेक भागात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. दुबार पेरणी, खते आणि बियांणासाठी सरकारने शेतक-यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.
धनंजय मुंडेंनेही शिवसेनेचा समाचार घेतला. कर्जमाफी आणि समृद्धी महामार्गावरुन शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचे मुंडे म्हणालेत. कर्जमाफीसाठी पैसे नसतील तर सरकारने मुंबई महापालिकेच्या ६० हजार कोटी रुपयांच्या ठेवी घ्यावात असे त्यांनी नमूद केले. भ्रष्टाचारावरुन त्यांनी सरकारला चिमटा काढला. सरकार गोलगोल आहे, त्यात सगळा झोल झोल आहे, म्हणून या सरकारवर जनतेचा भरवसा राहिलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतल्याने विरोधकांमधील मतभेद समोर आले आहेत. तर विरोधकांमध्ये फूट पडल्याने भाजप सरकारला दिलासा मिळाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2017 6:08 pm