ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांची माहिती
राज्यातील ग्रथालयांच्या कामकाजात सुसूत्रता यावी आणि गतिमानता यावी यासाठी राज्यातील १२ हजार १६० ग्रंथालये संगणक आणि इंटरनेट प्रणालीने जोडली जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व अ वर्ग ग्रंथालयांमध्ये किंडल्स आणि ई-बुक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची माहिती राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी दिली.
रायगडातील ग्रंथालयांची माहिती घेण्यासाठी व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी किरण धांडोरे रायगडच्या दौऱ्यावर आले होते. अलिबाग येथील जिल्हा ग्रंथालयाला त्यांनी आज भेट दिली. त्यांनतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा ग्रंथालयाच्या अधिकारी प्रतिभा ताटे व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते, त्यामुळे काळानुरूप ग्रंथालयांनाही बदलावे लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यातील सर्व विभागस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय ग्रंथालये संगणक आणि इंटरनेट सुविधांनी जोडली जाणार आहे.
प्रदीर्घ वाचनापेक्षा लोकांना मुद्देसूद लिखाण वाचण्यात जास्त रुची आहे. तरुण पिढी गुण मिळवण्यापुरते वाचन करते. त्यामुळे अवांतर वाचनाची सवय सुटत चालली आहे. अशा परिस्थितीत वाचकांना ग्रंथालयापर्यंत आणण्याची जबाबदारी सर्वाना उचलावी लागणार आहे. तरुण पिढीच्या आवडीनुसार, तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रंथालय चळवळ रुजवावी लागणार असल्याचे धांडोरे यांनी सांगितले.
आजची पिढी वाचत नाही असे नाही. आजची वाचनाची माध्यमे बदलली आहेत. इंटरनेटवर आवश्यक तेवढीच माहिती वाचली जाते. जर भावी पिढीला वाचनाची आवड लावून वाचनसंस्कृती वाढवायची असेल तर पालकांनी त्यासाठी पुढाकर घेतला पाहिजे. आपल्या घरात चांगली पुस्तके आणून ती वाचली पाहिजेत. ते पाहून पुढची पिढी त्याचे अनुकरण करेल, असे धांडोरे म्हणाले.

गावात ग्रंथालय किंवा वाचनालय आहे हे काही वेळा माहीत नसते. शासनाने ठरवून दिलेल्या कमीत कमी वेळेपुरतीच काही ग्रंथालय सुरू ठेवली जातात. ग्रंथालयांनी आपली वेळ वाढवली पाहिजे. राज्यात वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथालयाचे जाळे वाढविले पाहिजे. त्यासाठी ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील अ वर्ग ग्रंथालयांमध्ये किंडल्स आणि ई-बुक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस विचाराधीन असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.