विधानसभेत सरकारची स्पष्टोक्ती; चंद्रपुरात बंदी कायम ठेवणार

नागपूर : संपूर्ण राज्यभर दारूबंदी लागू करणार नाही. तसेच चंद्रपूर येथे सध्या लागू असलेली बंदीही उठवणार नाही, असे सोमवारी सरकारने विधानसभेत स्पष्ट केले.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्य़ात दारूबंदी लागू करण्यात आली. हा जिल्हा तेलंगण, मध्य प्रदेश, छत्तीसगड सीमेला लागून असल्याने शेजारी राज्यातून मोठय़ा प्रमाणात दारू चंद्रपूर जिल्ह्य़ात आणली जाते. तसेच बनावट दारू विक्रीचे प्रमाणही जिल्ह्य़ात वाढले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या दारूबंदी असलेल्या जिल्ह्य़ात विषारी दारू प्राशन केल्याने अनेकांचे मृत्यू झाले आहे. ही दारूबंदी फसली आहे. तेव्हा एकतर दारूबंदीची नीट अंमलबजावणी करा, अन्यथा दारूबंदी उठवा व राज्यभर दारूबंदी लागू करा, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.

सरकारतर्फे निवेदन करताना उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात दारूबंदी लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. लोकसहकार्याशिवाय दारूबंदी यशस्वी होणार नाही, त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदीची अधिक प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले व बंदी उठवण्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली. दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी काय उपाययोजना करायच्या, यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती एक महिन्यात अहवाल सादर करेल, असे सांगितले.