राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असली तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा विरोध अद्याप कमी झालेला नाही. काँग्रेसतर्फे आजपासून शेतकऱ्यांसाठी विशेष अभियान सुरू करण्यात येत आहे. ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या अभियानातून काँग्रेस शेतकऱ्यांचा ‘आवाज’ राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार आहे.

कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी राज्यभरात आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र, कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा विरोध अजून कमी झालेला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसतर्फे राज्यभर अभियान राबवले जाणार आहे. माझी कर्जमाफी झाली नाही, या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस राज्यातील शेतकऱ्यांचा ‘आवाज’ राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार आहे. कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी काँग्रेस हे अभियान राबवणार आहे. या अभियानाची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यातून होणार आहे. या अभियानांतर्गत ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही तेथील शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांकडून भरून घेतलेले अर्ज सादर करण्यात येणार आहेत, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात पुन्हा कर्जमाफीचा मुद्दा गाजणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.