मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिल्यानंतर लॉकडाउन नको असा सूर उमटताना दिसत आहे. लॉकडाउनच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपा आक्रमक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. लॉकडाउनच्या मुद्द्यावरून पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.

पुण्यात लागू करण्यात आलेला मिनी लॉकडाउन आणि राज्यात लॉकडाउनचे संकेत दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत टीका केली आहे. “करोना नियंत्रणात संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने आपलं अपयश लपवण्यासाठी पुण्यात लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउन लावला तर आपलं अपयश झाकता येईल, असं या लबाड सरकारला वाटतं. पण या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचं काय होणार? याचा विचार आधी या सरकारने करायला हवा,” असं पाटील म्हणाले.

“पहिल्या लॉकडाउनमधून सावरत सावरत आता कुठे सर्वसामान्य जनतेचं जीवन रुळावर येत होते. परंतु आता या सरकारच्या मूर्खपणामुळे पुन्हा एकदा गोरगरीब जनतेची पिळवणूक होणार आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या या लबाड सरकारने पुन्हा लॉकडाउन करताना जनता जुमानत नसल्याचं कारण देऊन यावेळी जनतेवरच आपल्या अपयशाचं खापर फोडलं आहे,” असा आरोप पाटील यांनी केला.

“ठाकरे सरकारने करोना नियंत्रणासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे आणि करोनाचे निर्बंध जसं की सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे इत्यादी नियम आणखी कडक करायला हवे होते. कारण हा लॉकडाउन गोरगरीब जनतेला परवडण्यासारखा नाही. या सरकारला जर लॉकडाउन लावायचाच असेल, तर त्यांनी आधी हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावावा. जगात जिथे जिथे पुन्हा कठोर लॉकडाऊन करण्यात आले, तिथल्या सरकारनं त्यांच्या जनतेच्या मदतीसाठी भरघोस पॅकेजदेखील आधी पोहचवले होते. उद्धव ठाकरेजी, थोडा अभ्यास करत जा!,” असा सल्ला पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.