मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये १५ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा देखील भंग केल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. “मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत बोलताना भारत भालके यांचं नाव घेतलं. पंढरपूर निवडणुकीसाठी अपवाद करण्याचं देखील कारण नव्हतं. पण मुख्यमंत्र्यांनी भारत भालके यांचं नाव घेणं हा आचारसंहितेचा भंग आहे का? हे तपासावं लागेल”, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनवर देखील टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

लॉकडाऊनबाबत घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाला यातून अपवाद म्हणून वगळल्याचं जाहीर केलं आहे. “एक अपवाद आपल्याला करावा लागणार आहे. कारण पंढरपूर-मंगवेढा विधानसभा मतदारसंघात काही दिवसांत मतदान होणार आहे. तिथले आपले लोकप्रतिनिधी भारत भालके यांचं करोनामुळेच निधन झालं होतं. दुर्दैवाने ते गेले. त्या जागेसाठी पुन्हा मतदान होणार आहे. त्यानंतर तिथे देखील हे निर्बंध लागू होतील”, असं ते म्हणाले आहेत.

राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउनच्या निर्णयावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या उल्लेखावर प्रवीण दरेकरांनी आक्षेप घेतला आहे. “पंढरपूरच्या निवडणुकीसाठी अपवाद करण्याचं काही कारण नव्हतं. संचारबंदी, नियम सगळ्यांना असतात. भारत भालके यांचं निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संवादात नाव घेणं हा आचारसंहितेचा भंग आहे का? हे तपासावं लागेल. कारण कळत-नकळत त्यांचा प्रचार वक्तव्याच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला दिसतंय”, असं दरेकर म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

मुख्यमंत्र्यांनी कष्टकऱ्यांची बोळवण केली!

आर्थिक सहाय्याची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी कष्टकऱ्यांची बोळवण केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. “कष्टकरी लोकांच्या अकाऊंटमध्ये ५ हजार रुपये टाकण्याची मागणी आम्ही केली होती. पण कुणाच्या अकाऊंटमध्ये १०००, कुणाच्या अकाऊंटमध्ये १२०० टाकून बोळवण करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे”, असं ते म्हणाले. “व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांना आधार देण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या संवादातून दिसलं नाही. जी मदत करण्याचं सांगितलं, ती तुटपुंजी आहे. जाहीर केलेली मदत देखील इतर कुठल्यातरी योजनेमधली आहे”, असं देखील दरेकर म्हणाले आहेत.

 

“हा तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार!”

“लस मोठ्या प्रमाणावर केंद्राने दिली, म्हणून लसीकरण झालं. मॉलमध्ये, रेल्वे स्टेशनला, बसस्थानकावर बूथ स्तरावर तपासणी केंद्र आणि लसीकरण केंद्राचं नियोजन केलं असतं, तर या गोष्टी आतापर्यंत आवाक्यात आल्या असत्या. पण आपण तहान लागल्यावर विहीर खोदायला जात आहोत. किमान आता तरी जे सांगितलंय ते द्यावं आणि पुन्हा आवश्यकता भासल्यास अजून मदत द्यावी”, असं देखील दरेकर यावेळी म्हणाले.