राज्यात लॉकडाउन लागण्याची शक्यता बळावत चालली आहे. वाढत्या करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाउनबाबत चाचपणी सुरू असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. त्यानंतर करोना परिस्थितीची जाणीव करून देत सरकारला घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर राज यांनी मनसैनिकांना आवाहन केलं आहे.

राज्यात करोनानं थैमान घातल्यानंतर सरकारनं लॉकडाउन सदृश्य निर्बंध लागू करण्याचा विचार सुरू केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसे संकेत दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विविध उद्योजकांसह विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली. रविवारीही मुख्यमंत्र्यांनी अनेक मान्यवरांशी संवाद साधला. त्याचबरोबर करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णया आधी विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत मनसेनं सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

“महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवरून केलेल्या संवादात केलं. आपण सर्वांनी सरकारी सूचनाचं पालन करावं. सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे,” असं ट्वीट मनसेनं केलं आहे.

आज होणार निर्णय

करोना संक्रमण रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कठोर भूमिका घेणार असल्याचे सूतोवाच आधीच केले होते. दोन दिवसांत निर्णय घेऊ असं ठाकरे यांनी शुक्रवारी (२ एप्रिल) म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दोन दिवस चर्चा केली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यात लॉकडाउन करायचा की कठोर निर्बंध लागू करायचे, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.