करोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी यासंदर्भातला आदेश ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाउन असणार आहे. करोना विषाणूच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दिवाळीनंतर करोनाचा संसर्ग वाढतो आहे असं लक्षात आलं. मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून करोना संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधित क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
खरंतर देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाउन लागू करायचा असेल तर त्यासाठी आता केंद्र सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे. यासंदर्भातली सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारीच दिली होती. केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना अर्थात गाईडलाइन्सही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाउन करण्यासाठी राज्यांना केंद्राची संमती घेणं आवश्यक आहे. करोना कंन्टेन्मेंट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच संमती द्यावी असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.
राज्यातील करोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध हे टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येत आहेत. याबाबत ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी गाइडलाइन्सही जारी करण्यात आल्या होत्या. दिवाळीतल्या पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातली मंदिरंही खुली करण्यात आली. या सगळ्या सवलती कायम असणार आहेत. मात्र कोविड संसर्ग होऊ नये या संदर्भातले सगळे नियम पाळणं आवश्यक आहे असंही सरकारने आदेशात म्हटलं आहे. ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन कायम असणार आहे. त्यामुळे २०२० या वर्षात लॉकडाउन संपेल का या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. लॉकडाउन संपायला आता पुढचं वर्ष उजाडेल यात शंका नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2020 8:55 pm