दोन मुलांसह पित्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना परतवाड्यातील धामणगाव गढी येथे घडली. घरगुती वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
धामणगाव गढी येथे राहणाऱ्या सदानंद लालजी दहीकर (वय ३५) याचा पत्नीशी वाद सुरु होता. भांडणामुळे त्याची पत्नी दोन मुलांना सोडून माहेरी निघून गेली होती. चिखलदरा तालुक्यातील कालापानी येथे त्याच्या पत्नीचे माहेर आहे. गुरुवारी सदानंद हा दोन्ही मुलांसह पत्नीच्या माहेरी गेला. त्याने पत्नीला घरी परतण्याची विनंतीही केली. मात्र तिने नकार दिल्याने सदानंद पुन्हा धामणगाव गढी येथे परतला.
शनिवारी सकाळी धामणगाव गढीत दीपक अग्रवाल यांच्या शेतातील विहिरीतून दुर्गंधी येत होती. शेतात आलेल्या मजुरांनी विहिरीत बघितले असता त्यांना धक्काच बसला. गावात मजुरीचे काम करणाऱ्या सदानंद दहीकर आणि त्याच्या दोन मुलांचे मृतदेह पाण्यात तरंगत होते. गौरव (वय ८) आणि छोटी (वय ५) अशी सदानंदच्या मुलांची नावे आहेत. शुक्रवारी संध्याकाळी त्याने विहिरीत मारुन आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 4, 2017 9:00 pm