जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे असं मत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सगळ्या डॉक्टरांना, सरकारी रुग्णालयांना, जि्ल्हा रुग्णालयांना, आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार राहा असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे. कोणत्याही परिस्थितीत चाचण्या थांबवता येणार नाहीत असंही डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अर्चना पाटील यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
ताप, फ्लू यांसारखी लक्षणं दिसत असल्यास तर त्यासाठी वेळेत सर्वे केला गेला पाहिजे. रोज होणाऱ्या चाचण्या कोणत्याही परिस्थितीत थांबवता कामा नयेत. शहरी आणि ग्रामीण भागातील फिव्हर क्लिनिक्स यांनी रोजचे अहवाल दररोज सादर करावेत. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे यावर लक्ष ठेवण्यास आरोग्य विभागाला मदत होईल. असं डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे.

“सध्याच्या घडीला करोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात कमी झालं आहे. मात्र कोविड आणि नॉन कोविड रुग्णांना वेळेत उपचार मिळणं गरजेचं आहे. त्यामुळेच ग्रामीण आणि शहरी भागातील कोविड सेंटर्सने सज्ज रहावं. ” असंही डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे.