MHT CET 2019 Result : औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल 99.98 टक्के गुणांसह अव्वल ठरले आहेत. एमएचटी-सीईटीच्या https://mhtcet2019.mahaonline.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून वेबसाईटवर निकाल उपलब्ध आहे. निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे.त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाऊनलोड करून घेतला,याबाबतची माहितीही दिली जाईल,असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या माहितीनुसार, सीईटीचा निकाल हा 3 जून रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर होईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर, 4 जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 2 मे 2019 आणि 13 मे 2019 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान, सर्व पात्र उमेदवारांना त्यांचा स्कोअर, रॅंक आणि क्वलिफिकेशन स्टेटससह स्कोअरकार्ड पाहता येणार आहे. मात्र, निकाल पाहण्यासाठी जन्मतारिख, रोल नंबर ही आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना जवळ बाळगणे आवश्यक आहे. या परिक्षेत पात्र झालेले विद्यार्थ्यी पुढे काऊन्सेलिंग सेशनसाठी पात्र असतील. त्याचबरोबर मिळालेल्या रॅंकनुसार, विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीच्या फेऱ्यांसाठी ते पात्र ठरतील त्यानंतर त्यांचा प्रवेश निश्चत होईल, असेही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून नमूद करण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 92 हजार 354 विद्यार्थी बसले होते. तर 20 हजार 930 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले होते. पीएसएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) हे विषय घेवून 2 लाख 76 हजार 166 विद्यार्थी बसले होते. तर पीसीबी(फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) हे विषय घेवून 28 हजार 154 विद्यार्थी बसले आहेत.