गाईच्या दुधाला आजपासून (ता. 1) प्रति लिटर 25 रुपये दर देण्य़ाची तयारी सहकारी आणि खासगी दूध संघांनी दर्शविली असून राज्य शासन आणि दूध संघांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मंगळवारी यावर शिक्कामोर्तब झाले. जे दूध संघ 25 रुपये दर देणार नाहीत अशांवर यापुढे कारवाई अटळ असल्याचा इशाराही राज्य शासनाकडून देण्यात आला आहे.  अनुदानासाठी दुधाच्या गुणवत्तेची अट ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ अशी शिथील करण्याचा निर्णय घेण्यासही सरकारने यावेळी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले.

शेतक ऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘गोकुळ’ने आज आपल्या गाय आणि म्हशीच्या दूध विक्री किमतीत २ रुपयांची वाढ केली आहे. यापुढे ‘गोकुळ’च्या गायीच्या दुधाची ग्राहकांसाठी विक्री किंमत ही ४५ रुपये, तर म्हशीच्या दुधाची विक्री किंमत ही ५६ रुपये लीटर अशी राहणार असल्याचे संघाच्या वतीने कळविण्यात आले आहे. ही दर उद्यापासून अंमलात येणार आहे. दूध दरवाढीसाठी नुकतेच राज्यव्यापी आंदोलन झाले. या आंदोलनाची दखल घेत शासनाने दूध उत्पादकांकडून खरेदीच्या दरात वाढ केली. गायीचे दूध प्रतिलीटर २५ रुपयांना खरेदी करण्याचे आदेश शासनाने जाहीर केले. दूध खरेदीच्या या वाढीव दरामुळे ‘गोकुळ’ने आपले विक्रीचे दर आजपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या महिन्यात दूध आंदोलन पेटल्यानंतर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात 19 जुलै रोजी दुधाला 25 रुपये प्रति लिटरचा दर जाहीर केला होता. मात्र, काही मोजके दूध संघ वगळता इतर सहकारी, खासगी दूध संघांकडून नव्या दराची अंमलबजावणी केली जात नव्हती. इतर सहकारी, खासगी दूध संघांनी अंमलबजावणीसाठी तांत्रिक कारणांमुळे वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीला राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विभागाचे सचिव किरण कुरुंदकर, आयुक्त राजीव जाधव, 33 सहकारी आणि खासगी संघांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक आदी उपस्थित होते. या बैठकीत दूध संघांनी उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्टपासून शासनाच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रति लिटर 25 रुपये दर देण्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी तयारी दर्शविली आहे.

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रक्रिया संस्थांनी उत्पादित केलेल्या पिशवीबंद दुधासाठी कोणतेही अनुदान मिळणार नाही. मात्र, पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधासाठी राज्य सरकारकडून पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. लोणी वगळता दूध भुकटी व इतर दुग्ध उत्पादने यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. तसेच जे दूध भुकटी उत्पादक पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे अनुदानाचा लाभ घेतील त्यांना भुकटी निर्यातीसाठीचे अनुदान दिले जाणार नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.