महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये झालेल्या वातावरणातील बदलामुळे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि पर्यटनासाठी आलेले पर्यटक गारठून गेले. सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून शनिवारी दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. महाबळेश्वरमधी किमान तापमान शनिवारी १३.९ अंशांवर आलं होतं.

महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटक विकेंड साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले आहेत. महाबळेश्वरमध्ये केवळ उन्हाळ्याच्या दिवसातच हवा पालटासाठी पर्यटक येतात असे नव्हे तर येथील गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटकांची पाचगणी-महाबळेश्वरकडे रिघ लागलेली असते. कोरोनाचे सावट देशभर असले तरी पुरेशी काळजी घेत हजारो पर्यटक शुक्रवारपासून महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहीतीनुसार, महाबळेश्वरमध्ये शनिवारी कमाल तापमान १८.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १३.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळपासून ढगाळ हवामान, धुके टिकून होते. या वातावरणातही वेण्णालेक परिसर तसेच मुख्य बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. लोकांनी उबीचे कपडे अंगावरुन काढलेच नाहीत. फिरायला आलेली लहान मुलेही उबदार कपडे, कान झाकणारी टोपी, हातमोजे परिधान करुन फिरताना दिसत होते. या गुलाबी थंडीत पर्यटक सहकुटुंब भाजलेली कणसं, वाफाळलेला चहाचा, गरमागरम भजी याचा आनंद लुटताना दिसत होते.

महाबळेश्वरमधील विल्सन पॉइंट सनसेट पॉईंट म्हणूनही ओळखला जातो. महाबळेश्वरमधील हा एकच पॉईंट असा आहे की, येथून सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहता येतो. मात्र ढगाळ हवामानामुळे पर्यटकांची मोठी निराशा झाली.