“पाच वर्षे ज्यांनी आंब्याच्या झाडाखाली बसून आंबे खाल्ले, त्यांच्यावर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ आली आहे,” असा टोला ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपाला लगावला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ गुरूवारी शहरातील शुभमंगल कार्यालयात आयोजित पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अर्जून खोतकर, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकर चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे, ज्येष्ठ नेते जीवन गोरे, शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, माजी आमदार राहुल मोटे, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड आणि काही अन्य मान्यवर उपस्थित होते.

“जे दोन दिवस सरकार टिकवू शकले नाहीत, ते दोन महिन्यात सरकार पाडण्याची भाषा करीत आहेत. राज्यातील जनतेचा विश्वास आणि तिन्ही पक्षांतील समन्वयामुळे हे सरकार पुढील दोन महिने नव्हे, दोनशे महिने सरकार पडणार नाही. पाच वर्षे ज्यांनी आंब्याच्या झाडाखाली बसून आंबे खाल्ले, त्यांच्यावर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ आली आहे,” असा टोला सत्तार यांनी लगावला.

चव्हाणांना मोठे मताधिक्य मिळेल

“मराठवाड्यातील पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागील दोन कार्यकाळ आमदार सतीश चव्हाण यांनी अनेक परिश्रम घेतले आहेत. याची जाण मराठवाड्यातील पदवीधरांना आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजीमंत्री बसवराज पाटील हे चव्हाण यांच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. बुथनिहाय पदवीधर कार्यकर्ते चव्हाण यांच्या कामाची जाणीव करून देत मतदारांमध्ये जागृती करीत आहेत. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून सतीश चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. तुळजापूर आणि उमरगा तालुक्यातून ८० ते ९० टक्के मतदारांचा कौल चव्हाणांना असेल,” अशी ग्वाही माजीमंत्री मधुकर चव्हाण यांनी यावेळी दिली.