केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. या बंदमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेस पक्षाने केलं आहे.

“भारत बंद हा शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचा भारत बंद आहे. मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी भाजपा सरकार शेतकरीविरोधी, कामगारविरोधी काळे कायदे लादत आहे. भाजपाच्या पाठीशी आता रामही उभा राहणार नाही”, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच, “७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारतबंदमध्ये सहभागी व्हा!”, असं ट्विट करत जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही थोरात यांनी केलं आहे. याशिवाय, शेतकरी आंदोलन व भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील रिगल सिनेमाजवळील माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी ट्विटरद्वारे दिली.

आणखी वाचा- शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमधील १५ महत्वाचे मुद्दे; महाराष्ट्र, मुंबईत काय परिणाम?

दरम्यान, या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येत आहे. तर, देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे. नियमावली पाठवताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना भारत बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे. दुसरीकडे, 9 डिसेंबर रोजी शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे.