राज्यात आणि देशात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान झालं असून, याचा फटका कांद्याच्या पिकालाही बसला आहे. त्यामुळे कांद्याच्या भावानं सध्या सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अशातच राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना लसूण व मुळा खाण्याचा सल्ला दिला आहे.

अमरावती येथे बोलत असताना बच्चू कडू यांनी कांद्याच्या वाढत्या किंमतीबद्दल हे विधान केलं. “केंद्र सरकारनं इराणमधून नुकताच कांदा आयात केल्यानं संपूर्ण देशासह राज्यात कांद्याच्या किंमती भाव मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्य माणसानं बोंबलू नये, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. तर कांदाचे भाव वाढले पाहिजे कारण ७० वर्षाचा अनुशेष आहे. ज्यांना कांदा परवडत नसेल त्यांनी मुळा, लसूण खावा,” असा अजब सल्ला कडू यांनी नागरिकांना दिला. “हा कांदा शेतकऱ्यांचा नसून, आयात केलेला कांदा आहे. मग आयात केलेल्या कांद्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल असा प्रश्नही कडू यांनी उपस्थित केला.

परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहे. पिकांच्या नासाडीबरोबरच भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे. यात कांद्याच्या पिकालाही फटका बसला आहे. त्यामुळे आता सामान्यांना कांद्याच्या दरवाढीला सामोरे जावं लागत आहे. मुंबई महानगरात कांद्याच्या किरकोळ दराने ७०-९० रुपयांवर झेप घेतली, तर पुणे परिसरात तो ५० ते ७० रुपयांच्या घरात पोहोचला. राज्य सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे कांद्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.