राज्यात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. एककीडे आघाडी आणि मित्रपक्षांच्या जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला असला तरी शिवसेना भाजपा युतीच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर निशाणा साधत २८८ जागांचं वाटप हे देशाच्या फाळणीपेक्षाही भयानक असल्याची टीका केली होती. यावर उत्तर देताना संजय राऊत हे चांगले लेखक आहेत. ते अनेक उदाहरणातून आपली बाजू मांडत असतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. सध्या युतीची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे. जागा वाटप कोणत्याही क्षणी जाहीर केलं जाईल. जागा वाटपात कोणतीही समस्या नाही. विरोधकांनी युती होऊ नये म्हणून आपले देव पाण्यात ठेवले आहेत. त्यांचा कोणताही संकल्प पूर्ण होणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे युतीच्या जागावाटपाबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम असल्याचं दिसून येत आहे.

“युती आणि जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची अमित शाह यांच्याशी चर्चा झाली आहे. मी काॅलेजमध्ये असताना भविष्याचा अभ्यास केला आहे. परंतु आता अनेक दिवस त्यात खंड पडला आहे, अशी कोपरखळी त्यांना युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या प्रश्नावर उत्तर देताना मारली. तसंच आम्ही यावेळी २२० पेक्षा अधिक जागा जिकू” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधकांनी कामाला लागावं
“राज्यात सध्या आम्ही २० हजार शक्तीकेंद्र स्थापन करणार आहोत. तसंच प्रत्येक ठिकाणी एक बूथ प्रमुख हा हजार मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. अशी मोठी तयारी आम्ही करत आहोत. विरोधकांनी आता टीका न करता कामाला लागावं, म्हणजे त्यांचं डिपाॅझिट जप्त होणार नाही,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

शिवसेनेला विश्वासात घेऊनच राणेंबाबत निर्णय

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलिन करण्याचा निर्णय घेत भाजपात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. परंतु त्यांच्या भाजपा प्रवेशाला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. सध्या यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटील म्हणाले. त्यामुळे राणेंच्याही पक्षप्रवेशावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.