News Flash

गिरीश महाजन बंदूक घेऊन बिबट्याच्या मागावर; व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनी शिवारात बिबट्या दिसल्याचे सांगितले.

गिरीश महाजन

बिनधास्त आणि रांगड्या स्वभावासाठी ओळखले जाणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन त्यांच्या अतिउत्साही स्वभावामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावासह आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका बिबट्याने दहशत पसरवली आहे. गेल्या दोन महिन्यात नरभक्षक बिबट्याने सहा जणांचा बळी घेतला होता. या पार्श्वभूमीवर काल गिरीश महाजन यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश काढला होता. त्यानंतर वरखेडे येथे या बिबट्याला शोधण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली. यादरम्यान काल गिरीश महाजन बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वरखेडमध्येच होते. नेमक्या त्याचवेळी शेतकऱ्यांनी शिवारात बिबट्या दिसल्याचे सांगितले. त्यावेळी कोणताही विचार न करता गिरीश महाजन स्वत:ची बंदूक घेऊन बिबट्याला शोधायला शिवारात शिरले. त्यांनी स्वत:ची बंदूक हातात घेऊन तासभर जंगलाचा परिसर पिंजून काढला. परंतु, बिबट्या तिथून निसटून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, या सगळ्या प्रकारानंतर गिरीश महाजन यांच्या अतिउत्साहीपणावर टीका केली जात आहे. या घटनेची व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिबट्याला मारण्याची जबाबदारी वन विभागाकडे आहे. मग गिरीश महाजनांनी सुरक्षेची कोणतीही तजवीज नसताना स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न का केला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला. गेल्यावर्षी गिरीश महाजन एका शालेय कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी महाजनांनी कमरेला पिस्तूल लावून विद्यार्थ्यांना बक्षीसे वाटली होती. त्यावरूनही बराच वाद निर्माण झाला होता.

मात्र, गिरीश महाजन यांनी आपण कोणतेही चुकीचे कृत्य केले नसल्याचे म्हटले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी वरखेडे शिवारात गेलो असतानाच तेथे बिबट्या दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर मी वन विभागाच्या पथकासोबत शेतात पायी चाललो. माझ्यासोबत पुरेशी सुरक्षा व्यवस्था होती. ग्रामस्थ अडचणीत असताना आणि यापूर्वी पाच नाहक बळी गेलेले असताना मी गाडीत बसून राहू शकत नाही. माझा स्वभाव तसा नाही. मी शाकाहारी व्यक्ती आहे. वन्यजीव व प्राणी-पक्षांवर प्रेम करणारा मी माणूस आहे पण नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिल्यानेच मला हे पाऊल उचलावे लागले, असे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 3:11 pm

Web Title: maharashtra minister girish mahajan on leopard hunt video viral
Next Stories
1 अनिकेत कोथळेच्या भावांचा पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
2 लातूर-नांदेड मार्गावर क्रुझर-टेम्पोचा भीषण अपघात; ७ ठार, १३ जण गंभीर जखमी
3 राज्यातील ६४ खासगी खारभूमी योजनांच्या सरकारीकरणाचा प्रस्ताव
Just Now!
X