मंत्रिमंडळाचे खातेवाटप उद्यापर्यंत जाहीर व्हायला हरकत नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयातील बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. महाविकास आघाडीची बैठक संपली आहे. कुणाला कुठलं खातं द्यायचं हे निश्चित झालं आहे. सगळ्या गोष्टींच्या अंतिम निर्णयांपर्यंत चर्चा झाली असंही अजित पवार यांनी सांगितलं. तसंच अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांचा असेल. राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं याची यादी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली आहे. सगळं काही निश्चित झालं आहे उद्यापर्यंत पालकमंत्र्यांसहीत सगळं खातेवाटप होण्याची शक्यता आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नाही. मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यानुसार जी काही मागणी झाली त्यावर विचार करण्यात आला आणि मग निर्णय घेण्यात आला आहे. आता तो निर्णय मान्य करुन लोक कामाला लागतील अशी अपेक्षा आहे. मात्र आमच्यात कोणत्याही कुरबुरी, हेवेदावे नाहीत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पालकमंत्रीपद कुणाला कोणतं द्यायचं यावरही चर्चा झाली. सध्या ४३ मंत्री आहेत, त्यांच्याबाबतही चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत. उद्यापर्यंत सगळं खातेवाटप अगदी पालकमंत्री पदांसहीत जाहीर होण्याची शक्यता आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच कोणत्याही कुरबुरी, तक्रार, वाद आमच्यात नाही. कोणत्याही तथ्यहीन आणि आधार नसलेल्या चर्चांवर, अफवांवर विश्वास ठेवू नका असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

खातेवाटपावर तिन्ही पक्ष समाधानी आहेत का? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, ” हे बघा माझं असं मत आहे की तुटेपर्यंत कधीच काही ताणायचं नसतं. मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र एकदा पक्षाने निर्णय घेतला की तो मान्य झाला पाहिजे. प्रत्येक पक्षाने आपल्या परिने मागणी करण्याचं काम केलं आहे. आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.”