आम्ही निवडून दिलेल्या आमदारांनी ज्या प्रमाणात आणि ज्या पद्धतीने नुकतीच वेतन/निवृत्ती वेतनवाढ मंजूर करून घेतली आहे. त्याबाबत नागरिकांत नाराजी आहे. त्यामुळे या विधेयकाचा फेरविचार व्हावा अशी मागणी स्वाक्षरी मोहिमेतून करण्यात आली. सुजाण नागरिक दल (सुनाद) यांच्या वतीने ही मोहीम १४ व १५ ऑगस्ट रोजी राबविण्यात आली आहे. डॉ. मधुकर घारपुरे, प्रसाद पावसकर व जयप्रकाश वाळके यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. श्रीराम वाचन मंदिरसमोर स्वाक्षरी मोहिमेचा सकाळी शुभारंभ करण्यात आला.

सध्या राज्यावर असलेला कर्जाचा बोजा, शेतकरी, शिक्षक, सामान्य नागरिकांसमोरील आर्थिक संकटे, दुष्काळ, पूर-अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती विचारात घेता अशा प्रकारचे स्वत:ची वेतनवाढ मंजूर करून घेणे योग्य/आवश्यक नाही. आमदारांच्या या विधेयकास आपण फेरविचारासाठी पाठवावे, अशी विनंती राज्यपालांना या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. या स्वाक्षरी मोहिमेत डॉ. मधुकर घारपुरे, प्रसाद पावसकर, जयप्रकाश वाळके, सत्यजीत देशमुख धारणकर, सुहास सातोसकर, अ‍ॅड. पी. जी. पई, सोमनाथ जीगजीन्नी, स्टेट बँकेचे निवृत्त मॅनेजर वसंत करंदीकर, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रदीप जोशी, रोटरी राजू पनवेलकर, गिरीधर परांजपे, स्मिता फुले, विकास गोवेकर, व्यापारी संघाचे माजी जिल्हाध्यक्ष जयंत कुलकर्णी, प्रकाश मसूरकर, पल्लवी कामत, त्रिवेणी पावसकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद दर्शविला.