23 September 2020

News Flash

आमदारांना आचारसंहिता

विधिमंडळात आमदारांसाठी आचारसंहिता लागू झाली असून सभागृहात असताना मोबाइलवर इंटरनेटचा वापर करणे, व्हॉट्स अ‍ॅपवर चॅटिंग आदींना मनाई करण्यात आली आहे.

| December 22, 2014 02:09 am

विधिमंडळात आमदारांसाठी आचारसंहिता लागू झाली असून सभागृहात असताना मोबाइलवर इंटरनेटचा वापर करणे, व्हॉट्स अ‍ॅपवर चॅटिंग आदींना मनाई करण्यात आली आहे. नवीन सदस्यांबरोबर मंत्र्यांसह सर्वानीच विधिमंडळात शिस्तीने आणि सभागृहाचा सन्मान व आदब राखला जाईल, असे वर्तन राखावे, यासाठी ही आचारसंहिता आहे.

नवीन मंत्री व सदस्य सभागृहातील किमान प्रथाही पाळत नाहीत, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, छगन भुजबळ आदींनी सभागृहात वेळोवेळी केली होती. त्या वेळी सर्वच सदस्यांसाठी किमान कोणते संकेत व शिष्टाचार पाळावेत, यासाठी आचारसंहिता तयार करून ती प्रत्येकाला पाठवावी, अशा सूचना अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधिमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी या आचारसंहितेचे टिपण करून सर्वाना पाठविले आहे.

विरोधी पक्षात असताना भाजपने ज्या आक्रमक पद्धतीने सभागृहात काम केले व वेगवेगळ्या प्रश्नांवर घोषणाबाजी, गोंधळ घालून व फलक फडकावून आंदोलने केली, ते आता सत्ताबदल झाल्यावर विसरून ही आचारसंहिता करण्यात आली आहे.

पक्षाचे चिन्ह असलेली कोणतीही वस्तू दुपट्टा किंवा फलक सभागृहात आणू नयेत, अशी सूचना आता करण्यात आली आहे.

आचारसंहितेतील महत्त्वाचे मुद्दे
*सभागृहात आल्यावर आसन ग्रहण करताना किंवा बाहेर जाताना अध्यक्षांना अभिवादन करावे
*अध्यक्ष बोलण्यासाठी उभे राहिल्यावर भाषण करणाऱ्या सदस्यांनी खाली बसावे
*सदस्याला बोलावयाचे असल्यास जागेवर उभे राहून अध्यक्षांचे लक्ष वेधून घ्यावे व परवानगीनंतरच बोलावे
*कोणाचीही निंदानालस्ती, असंसदीय शब्दप्रयोग व आरोप करू नयेत, अध्यक्षांनी ते असंसदीय ठरविल्यावर कोणतीही चर्चा न करता ते मागे घ्यावेत
*नव्याने निवडून आलेला सदस्य प्रथमच भाषण करीत असेल, तर त्यात अडथळा आणू नये
*सदस्याने आपली जागा सोडून अध्यक्षांच्या आसनाकडे जाऊ नये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 2:09 am

Web Title: maharashtra mlas must keep off mobiles whatsapp in assembly
Next Stories
1 आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी मरण यातना
2 गडकरी-रावते भेटीत परिवहन योजनांवर चर्चा
3 नाशिकमध्ये जानेवारीत जागतिक धर्मनिरपेक्षता नीती परिषद
Just Now!
X