मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा -अजित पवार यांची मागणी

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्या वेळी मुंबई विकास आराखडय़ात जो बदल करण्यात आला, त्यात एक लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, त्यातील दहा हजार कोटी रुपयांचा व्यवहार मुख्यमंत्री कार्यालयाशी झाल्याचा आरोप केला होता. आता ते मंत्री झाले आहेत, मात्र त्यांच्या या आरोपाचे काय झाले, त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी बुधवारी केली.

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावावर बोलताना अजित पवार यांनी भाजप-शिवसेना नेत्यांची फिरकी घेता घेता, राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर ठपका ठेवून भाजपमध्ये गेलेले आणि मंत्री झालेले विखे-पाटील व जयदत्त क्षीरसागर यांनाही टोले लगावले.

विकासकांच्या फायद्यासाठी मुंबईच्या विकास आराखडय़ात बदल करण्यात आला. त्याचा विकासकांना एक लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. हा भ्रष्टाचार असून त्यापैकी दहा हजार कोटी रुपयांचा व्यवहार मुख्यमंत्री कार्यालयाशी झाला आहे. त्यातील पाच हजार कोटी रुपयांचा हप्ता मुख्यमंत्री कार्यालयात पोचला, असा आरोप विखे यांनी केला होता. आता विखे यांना मंत्रिमंडळात घेतले आहे व त्यांच्याकडे गृहनिर्माण हे खाते दिले आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून त्यांना मंत्रिपद दिले का, तसेच त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे काय झाले, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

भुजबळांकडून पथकराचे समर्थन

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी वाहनांना पथकर आकारला जातो, त्याचे समर्थन केले. राज्यात मोठमोठे रस्ते होत आहेत. मोठे रस्ते झाले तर पथकर लागणारच, त्याशिवाय रस्ते होणार नाहीत. युती सरकारने काही ठिकाणचे पथकर बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु आता रस्त्याची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दिली जातात आणि प्राधिकरण त्यावर पथकर आकारते, अशी चलाखी केली आहे. भाजपने निवडणुकीत टोलमुक्तीची घोषणी केली आणि आम्हालाच मुक्त केले, या भुजबळांच्या शेरेबाजीवर सभागृहात एकच हशा पिकला.

क्षीरसागर-पवार टोलेबाजी

शिवसेनेत अनेक निष्ठावान आमदारांना डावलून नुकतेच पक्षात आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री केले, अशी कोपरखळी अजित पवार यांनी मारली. क्षीरसागर यांनीही पवार यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. दादा आपल्या कृपेनेच मी मंत्री झालो, आपण ढकलत ढकलत इथपर्यंत आणले, आता मी मोकळा श्वास घेतोय, असा टोला त्यांनी हाणला. तर, माझ्यामुळे कुणाकुणाला मंत्रिपदे मिळतात ते कळले असा प्रतिटोला अजित पवार यांनीही लगावला.