धनंजय मुंडे यांचे विखेंना चौकशीचे आव्हान

मुंबई : मुंबईच्या विकास आराखडय़ात बिल्डरांना एक लाख कोटी रुपयांचा फायदा मिळवून देणाऱ्या तरतुदी केल्याबद्दल १० हजार कोटी रुपयांचा सौदा ठरला व मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाच हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला, असा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेते असताना आम्ही केला होता. मग त्याच आरोपांमधून किंवा सौद्यातून विखे-पाटील यांना मंत्रिपद देण्यात आले का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केला.

आरोपांची गृहनिर्माण मंत्रिपद मिळालेल्या विखे-पाटील यांनी चौकशी करावी, असे आव्हान मुंडे यांनी दिले. जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्यास सरकार का घाबरते, अशी विचारणाही मुंडे यांनी केली.

अभिभाषणाबद्दल राज्यपालांच्या आभारप्रदर्शनाच्या ठरावावर  बोलताना मुंडे यांनी सरकारविरोधात हल्ला चढवीत विखे-पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. जलयुक्त शिवार योजनेत २२-२५ हजार गावांमध्ये कामे झाली असली तरी हजारो गावांमध्ये दुष्काळ का आहे, असा सवाल मुंडे यांनी केला.