गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं राज्यभरात पुनरागमन झालं आहे.  पालघर, ठाणे जिल्ह्य़ात आज  (दि.21, रविवारी) अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी दक्षिण कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी, जालना, हिंगोली, औरंगाबाद जिल्ह्य़ातही जोरदार पावसाचा इशारा आहे.

दरम्यान, राज्यात सध्या पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. शनिवारी दुपारी पश्चिम उपनगरात दहिसर, बोरिवली, तसेच भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई, डोंबिवली येथे दमदार पाऊस पडला.  शुक्रवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रावरील जुलै महिन्यातील ३६.२ अंश से. हे सर्वोच्च तापमान नोंदवल्यानंतर शनिवारी पारादेखील चार अंशाने खाली येऊन ३२.५ अंशावर स्थिरावला. हवामान विभागाच्या माहितीनुसार नवी मुंबई येथे २० ते ४० मिमी पावसाची दुपारी नोंद झाली. तर ठाणे आणि परिसरात १० ते २० मिमी पाऊस झाला. रात्री साडेआठ वाजता सांताक्रूझ केंद्रावर केवळ ५.४ मिमी तर कुलाबा केंद्रावर १०.४ मिमी पाऊस नोंदवण्यात आला. हवामान विभागाचे संकेतस्थळ आणि मुंबई वेदर लाइव्ह हे अ‍ॅपदेखील पाच तास कार्यरत नव्हते.