Maharashtra SSC 10th Result 2018: राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन्ही परीक्षांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात कोकणमधील ३७ हजार ७६९ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अन्य विभागांच्या तुलनेत कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असले तरी विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण नक्कीच लक्षणीय आहे.

कोकणचा दहावीचा निकाल ९६ टक्के इतका आहे. कोकणातील ६२७ शाळांपैकी तब्बल २४९ शाळांचा निकाल शंभर  टक्के तर ३०९ शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त (९० ते ९९.९९ टक्के) इतका लागला आहे. फक्त एका शाळेचा निकाल ५० ते ६० टक्क्यांमध्ये लागला आहे. आठ शाळांचा निकाल ७० ते ८० टक्के, ६० साळांचा निकाल ८० ते ९० टक्के इतका लागला आहे.  हा विभाग दरवर्षी का अव्वल ठरतोय, याचा घेतलेला हा आढावा…

> कोकणच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा वर्षांपूर्वी स्वतंत्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले.

> त्यापूर्वी कोकणातील विद्यार्थी कोल्हापूर विभागीय मंडळाच्या परीक्षांना बसत होते. कोकणासाठी स्वतंत्र व्यवस्था झाल्यानंतर विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला. सद्यस्थितीनुसार कोकणातील विद्यार्थी उत्तीर्णतेबाबत अन्य विभागीय मंडळांच्या तुलनेत सातत्याने पहिल्या क्रमांकावर असून यंदाही त्यांनी ही परंपरा कायम राखली आहे.

> कोकणात गेल्या काही वर्षांमध्ये ताणरहित व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षांसाठी मंडळातर्फे खास उद्बोधन वर्ग घेण्यात आले होते. विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे संयुक्त मेळावे, गैरमार्गविरोधी अभियान इत्यादी उपक्रमांमुळे या भागातील गैरप्रकार कमी झाले.

> या शिवाय कोकणातील अनेक शाळा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यादा वर्ग घेतात. त्यामुळे मुलांचा नियमित अभ्यास, उजळणी इत्यादी बाबींकडे लक्ष देणे सोपे होते, असे या भागातील शिक्षकांचे म्हणणे आहे.

> कोकण विभागाची २०१३ पासूनची कामगिरी:

२०१३ – ९३. ७९ टक्के

२०१४ – ९५. ५७ टक्के

२०१५ – ९६. ५४ टक्के

२०१६ – ९६. ५६ टक्के

२०१७ – ९६. १८ टक्के

२०१८ – ९६. ०० टक्के