23 January 2021

News Flash

सोशल मीडियावर मोदींवर आक्षेपार्ह टीका, राज्यात अनेकांना पोलिसांची नोटीस

कांजुरमार्गमध्ये राहणाऱ्या तरुणाला नोटीस

मोदींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या तरुणांना आणि काही पत्रकारांनाही नोटीस बजावल्याचे समोर येत आहे.

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टीका करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबईतील कांजुरमार्ग येथे राहणाऱ्या महेंद्र रावले या तरुणाचाही यात समावेश आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ अंतर्गत पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

कांजुरमार्गमध्ये राहणाऱ्या महेंद्र रावले (वय ३१) या तरुणाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ‘सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याची माहिती प्राप्त झाली असून यामुळे शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून कोणताही अनुचित प्रकार किंवा कृत्य घडून सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल’ असे या नोटीशीत म्हटले आहे.

सोशल मीडियावर ही नोटीस व्हायरल होत असून ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने कांजुरमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गजानन टपले यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधला. टपले यांनी नोटीशीला दुजोरा दिला असून आठ दिवसांपूर्वी आम्ही नोटीस बजावली होती असे त्यांनी सांगितले. ‘आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा स्वरुपाची एक घटना होती. रावले नामक तरुण सोशल मीडियावर मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याची तक्रार होती. त्यामुळे ही नोटीस बजावली’ असे त्यांनी स्पष्ट केले. महेंद्र रावलेने नेमकी काय पोस्ट केली होती हे मात्र समजू शकलेले नाही.

कांजुरमार्गपाठोपाठ राज्यातील अन्य भागांमध्येही मोदींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या तरुणांना आणि काही पत्रकारांनाही नोटीस बजावल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियावर अशा काही नोटीस व्हायरल होत असून कांजुरमार्ग वगळता अन्य कोणत्याही नोटीशीला पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील यावरुन राज्य सरकारवर टीका केली. ‘महाराष्ट्रात अनेकांना पोलिसांकडून येत असलेली नोटीस ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे’, अशी टीका त्यांनी केली. राज्यातील महागाई, बेरोजगारी व मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराविरुद्धचा जनआक्रोश दडपून टाकण्यासाठी राज्य सरकारकडून पोलीसी बळाचा गैरवापर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कितीही कोंबडे झाकले तरी जनआक्रोशाचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही असेही मुंडेंनी म्हटले आहे. टीका सहन होत नसेल तर सत्ता सोडावी. टीका करणाऱ्यांच्या मागे  पोलीस लावण्याचा अर्थ सरकारचे अस्तित्व डळमळीत झाले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारची पत्रकारांवर पाळत होती, आता पोलीस पत्रकारांना चौकीत बोलवून धमकावत आहेत. माध्यमांवरचा घाला हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचा दावा त्यांनी केला. सोशल मीडियावरील टीकेने सरकारच्या अस्तित्वाला धक्का दिला. त्यांची पोलखोल झाली असून पोलीस चौकशीचा ससेमिरा हा आणीबाणीपेक्षा भीषण असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2017 7:55 pm

Web Title: maharashtra mumbai police issues notice to several including journalist for post against narendra modi on social media
Next Stories
1 लव्ह जिहादप्रकरणात व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगद्वारे तरुणीची साक्ष
2 आयएएस अधिकाऱ्याच्या आदेशानंतरही जळगाव पोलिसांची कारवाईत चालढकल
3 नारायण राणे भाजप नेत्यांच्या संपर्कात नाहीत: चंद्रकात पाटील
Just Now!
X