रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच असून मंगळवारी सकाळी नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डबे रुळावरुन घसरले. आसनगाव- वाशिंददरम्यान हा अपघात झाला असून अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. पावसामुळे रुळाखालील खडी वाहून गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नागपूरहून मुंबईला येणारी दुरांतो एक्स्प्रेस सकाळी साडे सहाच्या सुमारास आसनगाव येथे पोहोचली. आसनगाव- वाशिंददरम्यान दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनसह नऊ डबे रुळावरुन घसरले. अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. अपघातामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांची वाहतूक खोळंबली आहे. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वेचे पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहे.

गेल्या १५ दिवसातील हा तिसरा रेल्वे अपघात आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेस आणि कैफियत एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले होते. उत्कल एक्स्प्रेसच्या अपघातात २० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातात ७४ प्रवासी जखमी झाले होते. गेल्या तीन वर्षांमध्ये २८ मोठे रेल्वे अपघात झाले असून यात एकूण २५९ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एकूण ९७३ प्रवासी जखमी झाले. लागोपाठ दोन रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभूंचा राजीनामा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय न घेता ‘वाट पाहण्याची’ सूचना केली होती.आता पुन्हा एकदा रेल्वे अपघात झाल्याने प्रभूंच्या अडचणी वाढल्या आहेत.